भंडारा : भंडारा जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल आज सोमवारी घोषित झाला. तब्बल अडीच वर्षानंतर झालेल्या या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संयुक्त बळीराजा जनहित पॅनलने निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे. बळीराजाचे एकूण दहा संचालक निवडून आणले आहेत. ही निवडणूक १८ संचालक पदासाठी झाली असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे आणि भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला.
भंडारा जिल्ह्यातील महत्वाची कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून तुमसरची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार राजू कारेमोरे यांच्या शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे ३ तर, भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जय किसान महाविकास पॅनलचे ४ आणि अपक्ष १ असे १८ संचालक निवडून आले आहेत.
विदर्भातील तुमसर- मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका मागील अडीच वर्षापासून रखडल्या होत्या. उच्च न्यायालयाने ३ महिन्यात बाजार समितीची निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. या निवडणुकीत एकूण ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाकोळली होती.