बुलढाणा : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये बुलढाण्याचा सुपुत्र शहीद झाला आहे. पळसखेड नागो या गावातील रहिवासी असलेल्या दीपक बनसोडे यांना जम्मू-काश्मिरमध्ये वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी उद्या शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दीपक बनसोडे यांच्या शहीद झाल्याची बातमी कळताच कुटुंबीयांना हादरा बसला. दीपक बनसोडे यांच्या जाण्याने पळसखेड नागो या गावावर शोककळा पसरली आहे.
दीपक बनसोडे यांचे पळसखेड नागो या मूळ गावीच लहानेचे मोठे झाले. याच गावामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. दीपक बनसोडे हे पाच वर्षापूर्वी सैन्यात भरती झाले होते. ते जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होते. जम्मू-काश्मीर येथील हेडकॉटर 7 सेक्टर आर आर या ठिकाणी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना ते शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती अजून सुरूच आहे.
दहशतवाद्यांकडून घुसखोरी, जवानांवर गोळीबार यासारख्या घटना वारंवार समोर येताना दिसत आहेत. भारतीय जवान देखील दहशतवाद्यांच्या या कारवायांना चौख प्रत्युत्तर देत आहेत. तीन दिवसांपूर्वी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना जवानांनी घेराव घातला होता. १२ आणि १३ जून रोजी झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले होते.