बुलढाणा : बुलढाणाण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुलढाण्यातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातील वसतिगृहामध्ये अस्वल घुसल्याची घटना घडली आहे. वसतिगृहाच्या इमारतीमध्ये अस्वल शिरल्याचे कळताच सर्वांची एकच भंबेरी उडाली असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. तब्बल ८ तासांच्या प्रयत्नांनंतर अस्वलाला रेस्क्यू करण्यात वन विभागाला यश आले. अस्वलाला रेस्क्यू करून वन विभागाने अस्वलाला अंबाबरवा अभयारण्यामध्ये सोडले आहे.
याबाबत अधिक माहिती की, बुलडाणा शहरातील जिल्हा कारागृहाच्या बाजूला असलेल्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहामध्ये शुक्रवारी रात्री अस्वल शिरल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. वसतिगृहाच्या बाजूलाच जंगल आहे. त्यामुळे या जंगलातूनच हे अस्वल याठिकाणी आले असल्याचे बोलले जात आहे. याआधी देखील अनेकदा या वसतिगृह परिसरात अस्वल आढळून आले आहे.
शुक्रवारी रात्री ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या चौकीदाराला वसतिगृहाच्या इमारतीमध्ये अस्वल शिरल्याचे दिसून आले. या वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ बिल्डिंगचे सर्व दरवाजे बंद करून दिले आणि याची माहिती वन विभागाला दिली. काही वेळातच बुलडाणा वन विभागाचे रेस्क्यू पथक ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात पोहोचले. सुरुवातीला अस्वलाला पिंजऱ्यात बंद करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तो प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे मोठ्या शिताफीने वन विभागाच्या टीमने अस्वलाला डॉटच्या साहाय्याने सकाळी रेस्क्यू केले. त्यानंतर या अस्वलाला अंबाबरव अभयारण्यात सोडण्यात आले.