नागपूर : वडील कामावर जायला निघाले की, नमस्वी रोज त्यांना बघण्यासाठी घराच्या गॅलरीत येत होती. नेहमीप्रमाणे ती वडिलांना बघायला गॅलरीजवळ आली. वडिलांची नजर खालून वर गेली. ती ‘पप्पाऽऽऽ बाय’ म्हणून स्टीलच्या ग्रीलजवळ उभी राहत होती. नेमका तिने गॅलरीच्या लोखंडी ग्रीलवर चढण्याचा प्रयत्न केला. ग्रीलमधून ती खाली पडली. त्या दिवशी नमस्वीची ही हाक शेवटची ठरली. या घटनेत चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजता कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
नमस्वी प्रकाश मौदेकर, असे या चिमुकलीचे नाव आहे. प्रकाश मौदेकर (रा. अरविंदनगर) कुटुंब तिसऱ्या माळ्यावर किरायाने राहतात. नेहमीप्रमाणे सकाळी ९.३० वाजता प्रकाश मौदेकर हे त्यांच्या कामावर जाण्यासाठी निघाले. ते इमारतीच्या खाली पोहोचले. वडिलांना आवाज देण्याकरिता चिमुकली नमस्वी ही तिसऱ्या माळ्यावरच्या गॅलरीतील स्टीलच्या ग्रीलजवळ आली आणि त्यांना आवाज देण्याच्या प्रयत्नात चढण्याचा प्रयत्न करू लागली. त्याचवेळी तिचा अचानक तोल गेला आणि ती थेट खाली पडली. घटनेत ती गंभीर जखमी झाल्याने बेशुद्ध झाली. तिला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी प्राप्त वैद्यकीय सूचनेवरून यशोधरानगर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नागे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.