अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या एका गावात दहावीच्या १५ वर्षीय विद्यार्थिनीचा तिच्याच चुलत मावस काका व त्यांचे दोन मुले यांनी मिळून लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्याचाराबाबत पीडित मुलीने अगोदर तिच्या शिक्षिकेला सांगितले. शिक्षिकेने तात्काळ माना पोलिस ठाण्यात संपर्क साधून दामिनी पथकाला याची माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता घटना उघडकीस आली.
याप्रकरणी माना पोलिस ठाण्यात तीनही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपींना अटक केली आहे. अल्पवयीन पीडित मुलगी दोन वर्षांपासून आई-वडिलांपासून दूर राहत आहे. ती चुलत मावशीच्या आधाराने त्या गावातील विद्यालयात तीन वर्षांपासून शिक्षण घेत आहे. यादरम्यान ५५ वर्षीय चुलत मावस काका व त्यांचे २३ व २६ वर्षीय दोन मुले तिचा दररोज लैंगिक छळ करत असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमात उघडकीस आली.
गावातीलच शालेय शिक्षिका व दामिनी पथकातील महिला पोलिस रेश्मा जाधव आणि रोशनी गायकवाड यांनी या मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडून घडलेली हकीकत जाणून घेतली. घटनेनुसार तिचे मावसभाऊ पीडित मुलीला कोणत्याही कारणावरून तोंडाला पावडर का लावली? लिपस्टिक का लावली? अशा थोड्या थोड्या कारणावरून तिला मारहाण करून वाईट नजरेने कोठेही हात लावायचे. माना पोलिसांनी तीनही आरोपीविरोधात विविध कलमानुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली. पुढील तपास उपनिरीक्षक गणेश महाजन, जयकुमार मंडावरे व महिला पोलिस कॉन्स्टेबल जयश्री मेंढे करत आहेत.