यवतमाळ : एका अल्पवयीन मुलीची राजस्थानात विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा यवतमाळ पोलिसांनी पर्दाफाश केला. यामध्ये मुलीच्या आईसह एकूण 6 आरोपींचा समावेश आहे. विशेष म्हणजे संशय येऊ नये म्हणून मुलीचे व तिच्या आईचे बनावट आधारकार्डही तयार करण्यात आले होते. ही कारवाई शनिवारी (दि. 4) करण्यात आली.
मुलीशी लग्न करणारा शंकरसिंह सोहनसिंह (28 रा. करनीजी टेम्पल तारानगर जि. चुरू रा. राजस्थान), सत्तार मोहमद बैजीरद्दीन लोहार (40, रा. तारानगर जि. चुरू), ताज मोहमद बैजीरद्दीन लोहार (40, रा. जोगीवाला ता. भादरा जि. हनुमानगड), अब्दुल कमरोद्दीन भडमुंजा (49 रा. तारानगर जि. चुरू), अस्लमखा तस्वर खॉ पठाण, ईमत्याजबी सरदार खॉ पठाण (50 रा. अकोला) व पीडित मुलीची आई अशी आरोपींची नावे आहेत.
यवतमाळ शहरातील मोमीनपुरा भागात अल्पवयीन मुलीची एक लाख रुपयांत विक्री करून राजस्थानातील एका तरुणाशी लग्न लावण्यात आले. हा प्रकार 3 मे रोजी रात्री आठच्या सुमारास घडला. त्यानंतर मुलीला राजस्थान येथे सोडण्यासाठी टोळी चारचाकी वाहनाने जात असल्याची माहिती यवतमाळ शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आली.