अकोला : अकोला जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा मुलगा पृथ्वीराज देशमुख याच्यावर काही सराईत गुंडांनी अकोल्यात हल्ला केल्याची घटना घडली आहे. अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. पृथ्वीराज देशमुख हा स्वाद बेकरीसमोरच्या कपड्याच्या दुकानावर उभा असताना काही सराईत गुन्हेगारांनी त्याला अडवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पृथ्वी देशमुखला बेदम मारहाण देखील करण्यात आली आहे.
या घटनेनंतर नितीन देशमुख यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते अकोल्यातील सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती मिळत आहे. देशमुखांच्या मुलावर हल्ला करणारे सर्व आरोपी कृषीनगर भागातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
याबाबत बोलताना नितीन देशमुख म्हणाले कि, 30 मिनिट पोलिसांचं कुणीही आलं नव्हतं, सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे वाढत आहेत. पोलीस ठाण्यात हजर राहत नाहीत, आज माझ्या मुलावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला आहे, असं आमदार नितीन देशमुख म्हणाले.
पुढे म्हणाले, मी वारंवार एसपी साहेबांना विनंती केली, शहरात गुन्हेगारी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी 15 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या झाली होती. आज तशाच पद्धतीने माझा मुलगा तिथे दुकानाजवळ उभा होता. अचानक माझ्या मुलाच्या अंगावर प्राणघातक हल्ला केला आहे. एकजण चाकू घेऊन आला होता, तर एका जणाने फरशी डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. माझा मुलगा आणि त्याचा मित्र दोघांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. नाहीतर आज देखील मोठा अनर्थ घडला असता.
काही दिवसांपूर्वी आम्ही एसपी साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. आज पोलीस ठाण्यात आलो तर तीनच पोलीस हजर होते. एवढे मोठे पोलीस ठाणे असून देखील अर्धा तास कोणीच नव्हतं. विनंतीनुसार काय कारवाई करतात हे पाहू. पण आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका. पोलिसांनी कारवाई केली नाही, तर गुंडांचा बंदोबस्त आम्हाला करावा लागेल, असा इशारा नितीन देशमुख यांनी दिला आहे.