नागपूर : आता नागपूरमधून एक भयंकर बातमी समोर आली आहे. शनिवारी नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी खटल्याचा युक्तिवाद सुरु असताना वकिलाला हृदयविकाराचा झटका येऊन त्यात त्याचा मृत्यू झाला झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दिवाणी प्रकरणावर जिल्हा न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना वकील तलत इक्बाल कुरैशी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तेव्हा न्यायाधीश एस. बी. पवार यांनी त्यांना त्यांच्या खासगी गाडीतून तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
…आणि हृदयविकाराचा झटका..
मिळालेल्या माहितीनुसार, वकील तलत इक्बाल कुरैशी शनिवारी सकाळी जिल्हा न्यायालयात पोहोचले. सातव्या मजल्यावर असलेल्या वरिष्ठ विभागीय दिवाणी न्यायाधीश एस. बी. पवार यांच्या न्यायालयात त्यांची उलटतपासणी झाली. आपली प्राथमिक उलटतपासणी पूर्ण केल्यानंतर कुरैशी यांनी कोर्टाला दाखले देऊन ते जाऊन आपल्या बेंचवर बसले. यानंतर विरोधी पक्षाचे वकील आपली बाजू मांडत असताना अचानक कुरैशी अचानक बेंचवरून खाली कोसळले.
अखेर डॉक्टरांनी केले मृत घोषित
कुरैशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर यावेळी न्यायाधीश पवार ताबडतोब त्यांच्या जागेवरून खाली आले आणि कुरैशी यांना पाणी पाजले. यानंतर न्यायाधीशांनी कुरैशी यांना त्यांच्या खासगी वाहनातून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. तलत कुरैशी यांच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तेव्हापासून ते एकटेच राहत होते. त्यांच्या पश्चात दोन्ही विवाहित मुली आहेत. या घटनेमुळे न्यायालयात शोककळा पसरली आहे.