बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर जालना महामार्गांवर एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव एसटी बसने मेरा खुर्द फाट्यानजीक दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजू खोलगडे (वय ४५) नंदू सगट (वय ३७) अशी मृतकांची नावे आहेत. तर ज्ञानेश्वर धोमाळकर (वय ४०) हे जखमी झाले आहेत. तिघेही केळवद येथील रहिवासी आहेत. राज्य परिहवन महामंडळाची बस छत्रपती संभाजीनगर येथून नागपूर नागपूरच्या दिशेने येत होती. सोमवारी सायंकाळच्या सुमारास बस मलकापूर जालना महामार्गांवरील मेरा फाट्याजवळ आली.
त्याचवेळी केळवद येथील तिघे मोटरसायकलने चिखलीकडे येत होते. मेरा खुर्द गावाजवळील एका वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला. तेवढ्यात बसने समोरील दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकीवरील तिघेही दूर फेकले गेले.
या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्याचबरोबर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत. पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.