गोंदिया: वाळू वाहतूक प्रकरणी जप्त केलेले दोन वाहने सोडण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या गोरेगाव येथील तहसीलदारसह नायब तहसीलदार आणि खासगी संगणक ऑपरेटरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सात मे रोजी तहसील कार्यालयात सापळा रचून ताब्यात घेतले. किसन कचरू भदाणे (वय ५०) असे लाचखोर तहसीलदाराचे, तर ज्ञानेश्वर रघुजी नागपुरे (वय ५६) नायब तहसीलदार व खाजगी संगणक ऑपरेटर राजेंद्र गोपीचंद गणवीर (वय ५२) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागादिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे गोरेगाव तालुक्यातील तेढा येथील रहिवाशी असून त्यांचे व त्यांच्या मित्राचे बिल्डिंग मटेरियल सप्लाय करण्याचा व्यवसाय आहे. तसेच त्यांच्या मालकीचे सहाचाकी प्रत्येकी एक टिप्पर आहेत. दरम्यान ४ मार्च २०२४ रोजी दोन्ही टिप्पर प्रत्येकी २ ब्रास वाळू वाहतूक करतअसताना तालुक्यातील गिधाडी शिवारात मंडल अधिकारी आणि पथकाने दोन्ही टिप्पर पकडून गोरेगाव तहसील कार्यालयात जमा केले. यावेळी आरोपी तहसीलदार याने तक्रारदार व त्यांचा मित्र यांना एक ब्रासचे चालान भरण्यास सांगितले. त्यानुसार ६ मार्च २०२४ रोजी तक्रारदार व त्यांचा मित्र यांनी प्रती वाहन प्रमाणे १ लाख २३ हजार ८८३ रुपयांचे चालान बँकेत भरले व त्याच्या पावत्या घेऊन तहसील कार्यालय गोरेगाव येथे गेले.
मात्र त्यांना टिप्परच्या चाव्या दिल्या नाहीत. दरम्यान गावातील त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने तक्रारदारांना गावात भेटुन सांगितले की, तुमचे टिप्पर सोडण्यासाठी व या पुढे वाळूची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी प्रती वाहन ५० हजार रुपये प्रमाणे दोन्ही वाहनांचे १ लाख रुपये तहसीलदार किसन भदाणे गोरेगाव यांना द्यावे लागतील, असा निरोप दिला. लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदार व त्यांचा मित्र यांनी दंडाच्या रकमेचे चालान भरलेले असताना देखील आरोपी तहसीलदार माने जप्त वाहने सोडण्याकरीता आणखी एक चालान भरा, अशी कार्यालयीन कामकाजाची भाषा द्विअर्थी वापरून जप्त दोन्ही वाहने सोडण्यासाठी एक लाख रूपयांची लाचेची मागणी करुन लाच स्विकारण्याची तयारी दर्शविली.