Tadoba-Andhari Tiger Reserve : नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनानं प्लास्टिक आणि कचरामुक्त ठेवण्यासाठी विशेष नियमावली तयार केली. पण, त्याला नागरिकांकडून केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे. कारण ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एका वाघिनीकडून पाणवट्यातून प्लास्टिकची बाटली काढून टाकल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे आणि प्राणी मित्रांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ताडोबात पर्यटकांचा ओघ जास्त आहे. या व्याघ्र प्रकल्पात प्लास्टिकच्या बाटल्या नियमित आढळत असतात. आता या बाटल्या चक्क वाघांच्या तोंडात दिसून येत असल्याने त्यांच्या आरोग्याचा आणि संवर्धनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
निमढेला बफर क्षेत्रात ‘ ’वाघिण तोंडात प्लास्टिकची बाटली पाण्यातून बाहेर काढतानाचा हा व्हिडीओ आहे. ‘जांभूळडोह’ सिमेंट बंधारा परिसरात ‘नयनतारा’वाघिण पाणी पिण्यासाठी आली होती. मात्र, तिथे प्लास्टिकची बाटली दिसल्याने तिने तीच तोंडात धरली. वन्यप्रेमी दिप काठीकर यांनी आपल्या कॅमेर्यात हा क्षण टिपला आहे.
ताडोबात कधी प्लास्टिक बाटल्या तर कधी प्लास्टिकचे वेष्टण आढळत आहेत. काही दिवसांपूर्वी नवेगाव प्रवेशद्वाराजवळ वाघ तोंडात कापड घेऊन फिरताना आढळून आला होता. निमढेला बफर क्षेत्रातच ‘भानूसखिंडी’ वाघिणीचे १५ महिन्यांचे तीन बछडे रबरी बुटांशी खेळताना दिसले होते. मे २०२३ मध्ये नवेगाव-अलीझंझा बफर क्षेत्रात ‘बबली’ या वाघिणीचे बछडे प्लास्टिकच्या बाटलीशी खेळताना दिसले होते. डिसेंबर २०२० मध्ये ‘जुनाबाई’वाघिणीचे बछडे प्लास्टिक पिशवीसोबत खेळताना आढळून आले होते. जानेवारी २०२१ मध्ये अलीझंझा बफर क्षेत्रात वाघिणीचा बछडा प्लास्टिक बाटली उचलतानाचे छायाचित्र समाजमाध्यमावर आले होते. बफर क्षेत्रात व्याघ्रदर्शन होत असल्याने पर्यटकांचा ओढाही इकडेच आहे.