नागपूर : रामटेक लोकसभेमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना बुधवारी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. रामटेक लोकसभेसाठी ‘वंचित’कडून शंकर चहांदे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, कौटुंबिक कारणावरून त्यांनी माघार घेतल्याचं वंचितने जाहीर केलं आहे. त्यामुळे रामटेकमध्ये आता महायुतीचे उमेदवार राजू पारवे, महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे आणि वंचितने पाठिंबा दिलेले किशोर गजभिये यांच्यात तिहेरी सामना रंगणार आहे.
किशोर गजभिये हे काँग्रेसमधून लोकसभेच्या तिकीटासाठी आग्रही होते. मात्र त्यांना डावलून काँग्रेसने रश्मी बर्वे यांना संधी दिली. परंतु रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले. त्यामुळे त्यांच्या जागी डमी फॉर्म भरलेले त्यांचे पती, श्यामकुमार बर्वे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राला किशोर गजभिये यांनी आक्षेप घेतला होता आणि अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता.
रामटेकमध्ये काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आलं होता. आता चहांदे यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे रामटेकमध्ये सातत्याने नाट्यमय राजकीय घडामोडी घडत असल्याने मतदार बुचकळ्यात पडले आहेत.
दरम्यान, अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर किशोर गजभिये म्हणाले होते की, रामटेक लोकसभा मतदारसंघातून मी माझा उमेदवारी अर्ज भरला होता. हा अर्ज वैध ठरला असून मला निवडणूक चिन्ह देखील प्राप्त झाले आहे. यामध्ये मला प्रेशर कुकर हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. मी माझ्या निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे त्याचा फटका कुणाला बसतो याच्याशी माझा काहीही संबंध नाही. त्याची मी चिंता देखील करत नाही. असं किशोर गजभिये म्हणाले होते.