Nagpur News : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या घोटाळ्यात आरोपी असलेले माजी आमदार सुनील केदार यांना बुधवारी रात्री मेडिकलमधील अतिदक्षता विभागातील चार तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रकृती बरी असल्याचा अहवाल सादर केला आहे. सकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी केदार यांना फिट घोषित केल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत केदार यांची तडकाफडकी मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. गेल्या २२ डिसेंबरपासून त्यांना मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या घोटाळ्याच्या निकाल २२ डिसेंबरला देण्यात आला. बँक घोटल्याप्रकरणी सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच साडे १२ लाख रूपयांचा दंड भरण्याचेही आदेश दिले होते. याच दिवशी छातीत दुखत असल्याने त्यांना मेडिकलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान त्यांना मायग्रेनचा त्रास, निमोनियाचे लक्षण आढळून आले होते. ताप वाढल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. याशिवाय किडनीचाही संसर्ग झाल्याने उपचाराचा कालावधी वाढला. मात्र, डॉक्टरांनी प्रकृती स्थिरावताच, ते ‘फिट’ असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर तडकाफडकी पोलिसांनी मेडिकलमध्ये पाचारण करीत, त्यांची कारागृहात रवानगी केली.
यावेळी मेडिकलमध्ये खुद्द पोलिस उपायुक्तांसह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. मेडिकलमधून पोलिस ताफ्यात कारागृहात रवानगी केल्यावर माजी आमदार सुनील केदार यांना कारागृहातील ‘आफ्टर बॅरेक’मध्ये इतर कैद्यासोबत ठेवण्यात येणार आहे.