भंडारा : भंडारा जिल्ह्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सैनिकी शाळेतील वसतीगृहामधून घरी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चिमुकल्याचा खिडकीतून खाली उतरताना पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धीरज सिताराम फरदे (वय-11) असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. सहावीत शिकणाऱ्या मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील केसलवाडा वाघ येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, केसलवाडा वाघ येथे सैनिकी शाळा आहे, त्या शाळेत 600 ते 700 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याच शाळेमध्ये धीरज हा सैनिकी विद्यालय केसलवाडा येथे सहावीत शिकत होता. शाळेला सुट्टी असल्याने तो घरी जाण्याच्या प्रयत्नात होता, याच प्रयत्नातून वसतीगृहातील पहिल्या मजल्यातील खिडकीमधून उतरून घरी पळून जाण्याच्या बेतामध्ये असताना खाली पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
वसतीगृहाच्या मागील बाजूने कर्मचारी विनायक सिंगनजुडे हे फिरत असताना त्यांना अचानक खाली काही पडल्याचा आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने ते धावत गेले असता धीरज फरदे हा विद्यार्थी जखमी अवस्थेत खाली पडलेला आढळून आला. त्यांनी इतर विद्यार्थी तसेच शाळेतील शिक्षक आल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती लाखनी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.