गोंदिया : आमगाव तालुक्यातील ननसरी येथील बारावी परिक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्याने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. ही घटना गोंदिया-रायपूर रेल्वे मार्गावर मंगळवारी (दि.२१) सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. मोहित चंद्रप्रकाश पटले (वय-१७) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेची नोंद आमगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आमगाव तालुक्यातील ननसरी येथील मोहित या विद्यार्थ्याने मार्च-एप्रिल महिन्यात बारावीची परिक्षा दिली होती. मोहित हा आदर्श विद्यालय आमगाव येथे शिक्षण घेत असताना सैन्य भर्तीची तयारी करत होता. काल परिक्षा मंडळाच्या वतीने बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला.
या परिक्षेत मोहित दोन विषयात नापास झाला. परिणामी त्याने काल सायंकाळी नैराश्येतून टोकाचे पाऊल उचलत आमगाव शिवारातील महादेव पहाडीजवळ धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे ननसरीसह आमगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.