नागपूर : महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून गेलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाला वाडी पोलिसांनी दोन तासांच्या आतच अटक केली. चौकशीत त्याने लग्नासाठी पैशांची गरज असल्याने त्याच रकमेच्या जुळवाजुळवीसाठी चोरी आणि सोनसाखळी चोरण्याचा मार्ग निवडल्याचे त्याने सांगितले.
रूपेश ऊर्फ रिंकू टिपले (वय 20, रा. सुरक्षानगर, दत्तवाडी) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. तो मूळचा वर्धा जिल्ह्यातील देवळीचा रहिवासी आहे. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 3 मोबाईल, सोन्याचे दागिने, दुचाकीसह 90,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री पावणे अकराच्या सुमारास खडगाव रोड, वाडी येथील रहिवासी भारती वासनिक (वय 24) या जेवणानंतर घराजवळच शतपावली करत होत्या.
याच दरम्यान दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दिसकावून नेले. भारती यांनी तत्काळ नियंत्रणकक्षाला फोन करून माहिती दिली. माहिती मिळाताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासोबतच तांत्रिक तपासही सुरू केला. त्याच्या मदतीने 2 तासांच्या आतच आरोपीला अटक केली.
पूर्वी झाला होता प्रेमविवाह
रुपेश हा एका कंपनीत हेल्परचे काम करायचा. दोन महिन्यांपूर्वीच त्याने प्रेमविवाह केला. मात्र, सासरकडील मंडळी त्याच्यावर रागावून होती. हळूहळू राग शांत झाला आणि त्यांनी जावई म्हणून रूपेशला स्वीकारले. पण, परंपरेनुसार लग्न करण्याची अट त्यांनी ठेवली. रूपेश त्यासाठी तयार झाला. पण, त्याच्याकडे पैशांची व्यवस्था नव्हती. त्यामुळे त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.