नागपूर : रेल्वेगाडीने विनातिकीट प्रवास करणे आणि बुक न करता सामानाची वाहतूक करणे गुन्हा आहे; परंतु गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवासी विनातिकीट प्रवासासह बुक न करता सामानाची वाहतूक करण्याचा प्रताप करतात. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने हे रोखण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. १ ते २० मेदरम्यान राबविण्यात आलेल्या मोहिमेत २३ हजार ५४९ प्रवाशांवर कारवाई करून १ कोटी २ लाख ११ हजार ७९० रुपये दंड वसूल करण्यात आला. दपूम रेल्वे नागपूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंह यांच्या नेतृत्वात वाणिज्य विभागातील अधिकारी, तिकीट निरीक्षक व वाणिज्य निरीक्षक यांच्यातर्फे १ ते २० मेदरम्यान दपूम रेल्वे नागपूर विभागातील विविध रेल्वेस्थानक व विभागातून जाणाऱ्या विविध रेल्वेगाड्यांमध्ये तपासणी केली.
वीस दिवसांत २३ हजार ५४९ प्रवासी विनातिकीट व बुक न करता सामानाची वाहतूक करताना आढळले. त्यांच्यावर १ कोटी २ लाख ११ हजार ७९० रुपये दंड आकारण्यात आला. रेल्वे नियमांचे उल्लंघन करणाच्या ५ हजार ६७८ प्रकरणांत १७ लाख ८७ हजार ६८५ रुपये दंड वसूल करण्यात आला. अनेक प्रवासी रेल्वेगाडी किंवा स्थानकावर धूम्रपान करतात. धूम्रपान करणाऱ्या २७ प्रकरणांत ५ हजार ४०० रुपये आणि रेल्वे व स्थानक परिसरात अस्वच्छता करणाऱ्या ३०६ प्रवाशांविरुद्ध कारवाई करीत ३१ हजार ५० रुपये दंड वसूल करण्यात आला. दपूम रेल्वेतर्फे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येत असल्यामुळे प्रवाशांनी तिकीट खरेदी करून प्रवास आणि बुक करूनच सामानाची वाहतूक करावी. यासह रेल्वेगाडी व स्थानक परिसरात धूम्रपान करू नये व अस्वच्छता करू नये, असे आवाहन वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंह यांनी केले आहे.