नागपूर : उन्हाळा लागताच अनेक विद्युत उपकरणांचा वापर सुरु केला जातो. विशेषतः एसी, कुलर, फ्रीज, फॅन यांसारख्या उपकरणांना प्राध्यान्य दिले जाते. पण ही उपकरणे वापरताना काळजी घेण्याचा सल्ला प्रशासनाकडून दिला जातो. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. असाच एक प्रकार नागपुरातील ओमनगर येथे घडला.
घरात खेळताना कुलरला स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये एका सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. आकांक्षा सचिन संदेले (वय 6, रा. बोरकरनगर) असे या चिमुकलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षाचे वडील सचिन हे मजुरी करतात. तर आई गृहिणी आहे. वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घटनेच्या दिवशी आई बाहेर कपडे धुवत होती.
आकांक्षा घरातच खेळत होती. खेळता खेळता ती कुलरजवळ गेली. कुलरला हाताचा स्पर्श झाल्याने तिला विजेचा जबर धक्का बसला. ती बेशुद्ध होऊन खाली पडली. काही तरी पडल्याचा आवाज आल्याने आई घरात धावली. आकांक्षा जमिनीवर निपचित पडून होती. आईचा आरडा-ओरड ऐकून शेजारी गोळा झाले. आकांक्षाला उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.