झरी (यवतमाळ) : मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबाला तब्बल २२ हजार ४०० रुपयांचे महिन्याचे वीजबिल आले आहे. विशेष म्हणजे एकाच खोलीचे हे बील असल्याने रोज मजूरी करणाऱ्या आदिवासी कुटुंबाला धडकी भरली आहे. यानिमित्ताने महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
झरी येथे केवलदास कोडापे हे आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहे. केवलदास यांची पत्नी कौशल्या कोडापे यांचे काही दिवसांपुर्वी कर्करोगाने निधन झाले. तर मुलगा हृदय विकाराच्या झटक्याने मरण पावला. कुटुंबातील कर्ता मुलगा गेल्यानंतर केवलदास यांची सून मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. एका छोट्या खोलीमध्ये हे कुटुंब वास्तव्याला आहे. असे असताना सदर कुटुंबाला तब्बल २२ हजार ४०० रुपयांचे वीजविल आले आहे. त्यांची दिवंगत पत्नी यांचे नावे हे विजबिल आले आहे. एव्हढ्या मोठ्या रक्कमेचे वीजबिल पाहून दिवंगत आदिवासी महिलेचे पती केवलदास कोडापे यांनी शिवसेना वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्याशी संपर्क केला.