अकोला : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. गुन्हेगारीच्या एका मागून एक घटना घडताना दिसत आहेत. अशातच आता अकोल्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तरुणाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना अकोला जिल्ह्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून या मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील एका गावात वास्तव्यास असलेली पीडित मुलगी दररोज शिक्षणानिमित्ताने मुर्तिजापूरला जात होती. या दरम्यान एका मुलाकडून त्या मुलीला धमक्या देऊन, मारहाण करून तिचे बळजबरी फोटो काढले. या प्रकारामुळे ती प्रचंड घाबरली असून तिने याबाबत कुणाला काहीच सांगितले नाही. गावात आपलं एकटंच घर. घरी सांगितले तर भांडणं होतील, असा विचार करुन तिने घरात फवारणीसाठी आणलेले कीटकनाशक घेतले. यातून तिची प्रकृती अत्यवस्थ झाली.
या संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेले. यावेळी मुलीने त्या युवकाचे नाव घेत त्याच्या त्रासामुळेच मुलीने विष घेतल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. या युवतीवर सध्या अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात गंभीर बाब म्हणजे तीन दिवस उलटले तरी पोलिस कारवाई झालेली नाही. असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.