वर्धा : राज्यभर सगळीकडे दहीहंडीचा उत्सव साजरा होताना दिसून येत आहे. डीजेच्या गाण्यांवर ताल धरत गोविंदांसह दहीहंडी प्रेमी सुद्धा थिरकताना दिसून येत आहेत. परंतु, वर्धा जिल्ह्याच्या सालोड (हिरापूर) येथे दहीहंडीच्या एकदिवस अगोदरच या आनंदावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सालोड (हिरापूर) येथे नवीन आणलेल्या डीजेची तपासणी करत असताना दोन युवकांचा विजेचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
विद्युत वितरण महामंडळाच्या मुख्यवाहिनीवरुन थेट विद्युत पुरवठा घेण्याचा प्रयत्न या डीजेचालकांनी केला होता. मात्र, यावेळी विजेचा हायपॉवर विद्युत धक्का बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सालोड (हिरापूर) येथे ही घटना घडली. सूरज चिंदूजी बावणे वय (27 वर्षे) आणि सेजल किशोर बावणे वय (13 वर्षे) अशी दोन्ही मृतांची नावे आहेत.
रात्रभर तारांना चिकटलेल्या अवस्थेत..
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन डीजे व धमाल पार्टी तयार केली असून आता सोमवारी गोकुळ जन्माष्टमी असल्याने दहीहंडी उत्सवाची ऑर्डर होती. त्यामुळे नव्याने आणलेल्या डीजेची तपासणी करण्यासाठी सेटअप तयार करून विद्युत जोडणी सुरू केली. याकरिता विद्युत तारांवरून थेट विद्युत पुरवठा घेण्याच्या प्रयत्नात असतानाच सूरज व सेजल या दोघांना विजेचा धक्का बसला. दोघेही विद्युत तारांना चिकटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे दोघेही रात्रभर तारांना चिकटलेल्या अवस्थेतच राहिले, तरीही कोणाला लक्षात आले नाही.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर घरच्यांच्या हे दोघे अजून कसे आले नाहीत असा प्रश्न पडल्यानंतर ही बाब लक्षात आली. त्यावेळी, पाहणी केल्यानंतर दोघेही विद्युत तारेला चिकटल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. दरम्यान, याप्रकरणी सावंगी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने दहीहंडी उत्सवावर दु:खाचे विरजण पडले. दोघांच्या अपघातील मृत्युने परिसरात शोककळा पसरली असून दहीहंडी उत्सावाचे कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.