बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रेशन दुकानदारांबाबत वाद-विवादाच्या घटना घडत असताना दिसणं येत असतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. दुकानदाराविरोधात तहसीलदारांकडे तक्रार केल्याने लाभार्थ्यांच्या घरी जाऊन दुकानदाराने त्यास मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी या गावातील हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या गावातील रेशन दुकानदार दर महिन्याला निर्धारित धान्य देत नसून कमी धान्य देत असतो. याबाबतची तक्रार ज्ञानेश्वर महाजन या ग्राहकाने तहसीलदारांना पुराव्यानिशी केली. तक्रार केल्याचा राग आल्याने रेशन दुकानदाराने या ग्राहकाला घरी जाऊन मारहाण केली असल्याची माहिती मिळत आहे.
रेशन दुकानदाराला अभय..
याप्रकरणी ग्राहकाने सिंदखेड राजा पोलिसात तक्रार केली. यावरून पोलिसांनी रेशन दुकानदाराविरुद्ध गुन्हाही दाखल केला. मात्र संबंधित सिंदखेड राजा तहसीलदारांनी याप्रकरणी रेशन दुकानदारावर कुठलीही कारवाई न करता अभय दिले असल्याचे समोर आले आहे.
गावातील अनेकांच्या तक्रारी अशा प्रकारची अरेरावी या रेशन दुकानदाराने गावातील अनेक नागरिकांसोबत केली आहे. गावातील नागरिकांना कमी धान्य देऊन उर्वरित धान्य काळ्या बाजारात विक्री करत असल्याची तक्रार अनेक नागरिकांनीही केली आहे. मात्र या रेशन दुकानदारावर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे.