नागपूर : प्रियकराने प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह जंगलात पुरल्याची घटना नागपूरमधून समोर येत आहे. नागपूर जिल्ह्यातील मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकर महेश केशव वळसकर याला अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे. तसेच त्याने पोलिसांना मृतदेह पुरलेली जागाही दाखवली आहे. प्रेयसीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महेश आणि प्रिया बागडी उर्फ प्रिया गुलक यांचे प्रेमसंबंध होते. प्रियाने महेशच्या मागे लग्नासाठी तगादा लावला असल्याची माहिती मिळत आहे. मात्र महेश तिला लग्नाच्या विषयाबाबत टाळत होता. अखेर महेशनचे तिचा खून करून मृतदेह जंगलात पुरला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
प्रिया बागडी ही तरुणी गेल्या सहा वर्षांपासून कुटुंबियांपासून वेगळी राहत होती. फरस, गोधनी इथं राहणारी प्रिया १६ ऑगस्ट रोजी बेपत्ता झाली होती. तिचा कुठेच शोध लागत नसल्यानं तिच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकऱणी शोध घेतला असता तपासात महेश वळसकर याला ताब्यात घेण्यात आलं.
प्रिया १६ तारखेपासून बेपत्ता होती, तिचा फोन लागत नसल्यानं तिच्या आईने खोलीवर जाऊन चौकशी केली. मात्र तिथं कुलूप लावलेलं दिसून आलं. शेजाऱ्यांकडे विचारणा केली असता ती आठवड्याभरापासून दिसली नसल्याचं सांगण्यात आलं. यानंतर आईने पोलिसात तक्रार दाखल दिली.
दरम्यान, महेशवर संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं. तेव्हा घाबरलेल्या महेशने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेचीसुद्धा चौकसी करण्यात आली. तेव्हा तिने सुद्धा विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांचा महेशवर संशय अधिकच बळावला आणि त्याला पोलिसी खाक्याचा दणका दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.
पोलिसांनी प्रियाचं लोकेशन शोधलं असता तेव्हा ती रामटेकमध्ये एका हॉटेलात होती अशं आढळलं. ते हॉटेल आरोपी महेश केशव वळसकरच्या मालकीचं होतं. त्याच्यासोबत ८ वर्षांपासून प्रियाचे प्रेमसंबंध होते. महेशच्या हॉटेलमध्ये ती मुक्कामी राहत असे. तिच्यावर महेशच पैसे खर्च करत असल्याचे समोर आले आहे. आरोपी महेश विवाहित होता आणि प्रियाने तिच्यामागे लग्नाचा तगादा लावला होता. त्यामुळे शेवटी महेशने तिचा गळा आवळून खून करून त्यानंतर हॉटेलपासून ३ किमी अंतरावर एका जंगलात महेशने प्रियाचा मृतदेह पुरून टाकला. अधिक तपास पोलीस करत आहेत.