वर्धा : वर्धा जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने आपल्या कॉलेजच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. वर्धाच्या सावंगी मेघे येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात ही घटना घडली असून पूजा रजानी, असं मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. पूजा एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिकत होती. वैद्यकीय कारणाने कॉलेजमध्ये गैरहजर राहत असल्याने तिला परीक्षा देण्यापासून रोखण्यात आल्याने ती तणावात होती, अशी माहिती येथील विद्यार्थ्यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी आपल्या हॉस्टेलच्या सहकारीसोबत परीक्षेवरील बंदी हटावी म्हणून ती वरिष्ठांकडे गेली होती, अशी माहिती तिच्या मैत्रणीने दिली आहे. त्यानंतर काही वेळानंतरच तिने कॉलेजच्या छतावरून उडी मारत जीवन संपवलं आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक व सावंगी पोलीस या यापाराकरणी अधिक तपास करत आहेत.
वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने काय म्हटले..?
या घटनेवर वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मागील काही दिवसांपासून तरुणी तणावात होती, त्यातून तिने आत्महत्या केली, असावी असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. विद्यार्थीना परीक्षेत न बसाविण्याबाबत महाविद्यालयाचा कोणताही वेगळा निर्णय नाही आहे.
युजीसीने कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी हा 75 टक्के थेरीत आणि 80 टक्के प्रॅक्टिकलमध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे, हे युजीसीच्या नियमात आहे. आजच्या घटणेबाबत वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन तातडीने माजी कुलगुरु राजीव बोरले यांच्या नेतृत्वात उच्च स्तरीय समिती स्थापन केली असून ही समिती या प्रकरणाचा तपास करणार, अशी माहिती रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी अभ्यूदय मेघे यांनी दिली आहे.