बुलढाणा : एक व्यक्ती अचानक बेपत्ता काय होतो, नातेवाईक सर्वत्र शोधाशोध करायला लागतात. मात्र, त्या व्यक्तीचा पत्ता लागत नाही. पोलीस या प्रकरणाची हरवला असल्याची नोंदही घेतात. अशात तपास बाजूला पडतो. या दरम्यान दोन वर्षाचा काळ उलटून जातो आणि अचानक एका छोट्याशा चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी पोपटासारखा बोलू लागतो. आपण अनैतिक संबंधातून बेपत्ता असलेल्या इसमाचा खून केल्याची कबुली तो देतो. बॉलिवूड मधील एखाद्या चित्रपट कथेला साजेसा असा हा सर्व प्रकार आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव तालुक्यातील एका गणेशपूर या गावात ही घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खामगाव तालुक्यातील गणेशपूर येथील रहिवासी तथा अमडापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात क्लर्क म्हणून काम करणारे नंदू श्रीराम धंदरे (वय ४२ वर्षे) हे दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झाले होते. दरम्यान, गणेशपूर येथील अंगणवाडीमध्ये पोषण आहार चोरी प्रकरणात संशयीत दिपक ढोके यास पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता दिपक याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी दिपक यास पोलीसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला.
दिपक हा मिसींग प्रकरणात संशयीत असल्याने नंदु धंदरे बाबत चौकशी केली. यावेळी सुध्दा त्याने उडवा-उडवीची उत्तरे देत प्रकरण मोडण्याचा प्रयत्न केला. पोलीसी खाक्या दाखवताच आपण व अतुल कोकरे यांनी नंदु यास प्रथम फावडयाने मारले व नंतर त्याच्या शेतात ओढत तुरीच्या ओळीत नेवून टाकले, अशी कबुली दिली. आरोपीच्या एका नातेवाईकाच्या विधवा पत्नी सोबत असलेल्या अनैतिक संबंधातून त्याचा अडथळा दूर करण्यासाठी त्याचा खून करून प्रेत गणेशपूर ते उंद्री रोडला लागून असलेल्या त्याच्या शेतामध्ये धुऱ्यावर पुरले आहे.
अशी कबुली दिपकने दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीने दाखविलेल्या घटनास्थळी खोदकाम केले असता मृतक नंदू श्रीराम धंदरे याचा हाडाचा सापळा मिळून आला. या संदर्भात आणखी तपास सुरू असून, या प्रकरणात अजून आरोपी आहेत का? याचा तपास सुरू आहे. लवकरच आणखी सत्य उघड होईल अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिली.