भंडारा : भंडारा जिल्ह्यामध्ये एक धकाकड्याक घटना घडली आहे. भाजीपाला आणण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या एका तरुणाने भंडारा शहराजवळील वैनगंगा नदीत मोठ्या पुलावरून उडी घेतली आहे. ही घटना कॅमेर्यात कैद झाली आहे. तरुणाचा मृतदेह अद्याप सापडला नसून पोलिसांकडून शोध सुरू आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वंश देवेंद्र बेलेकर(25 वर्ष) असं या तरुणाचं नाव आहे. वंश हा न्यू फ्रेन्डस कॉलनीतील रहिवासी होता. वंशच्या आईने सकाळी त्याला भाजीपाला आणायला सांगितलं होतं. तेव्हा तो स्कुटी घेऊन घराबाहेर निघून गेला. पण तो भाजीबाजारात न जाता तो वैनगंगा नदीवर पोहोचला.
मोठ्या पुलावर दुचाकी ठेऊन त्याने नदीत उडी घेतली. याची माहिती त्याच्या आईला देण्यात आली. माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी वैनगंगा पुलावर धाव घेतली. स्कुटीच्या डिक्कीत कागदपत्रे होती. त्यावरून नदीत उडी मारणारा वंश असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, मृतदेह सापडला नाही. वंश हा मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्या कुटुंबियांनी भंडारा पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली आहे.