वर्धा : वर्धा जिल्ह्यातील पारडी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परडी गावातील हर्षल बाबा वाघाडे या २२ वर्षीय युवकाने १७ वर्षीय मुलीला बावीस जानेवारीला पळवून नेले होते. मुलीचा शोध लागत नसल्याने मुलीच्या घरच्यांनी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तळेगाव पोलिस ठाण्यात दाखल केली होती.
मात्र, ३ फेब्रुवारीला पारडी येथील गणेश रंगारी यांच्या शेतातील विहिरीत दोन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेने कारंजा तालुक्यातील पारडी गाव सध्या चांगलेच सुन्न झाले आहे. हर्षल वाघाडे (वय २२) असं मुलाचे नाव आहे. तर मुलगी ही अल्पवयीन आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, दोघेही पारडी येथील रहिवासी आहेत. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, त्यांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्यामुळे दोघेही घरातून पळून गेले होते. घरचे त्यांच्या शोधत होते. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देखीलं दाखल करण्यात आली होती.
नातेवाईक आणि पोलिस त्यांचा शोध घेत असतांना तळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पारडी येथे जंगलातील एका विहिरीत दोघांचे मृतदेह आढळले. दोघांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याने परिसारत मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ठाणेदार संदीप धोबे पुढील तपास करीत आहे.