भंडारा : भंडाऱ्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचे समोर येत आहे. तुमसर शहारातील अंगणवाडी केंद्रात निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा महिला बचत गटाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे बालकांच्या जीवाशी खेळ करण्यात येत असल्याचा धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
अधिक माहिती अशी की, शाळा व अंगणवाडीतील मुलांना शासनाच्या वतीने पोषण आहार योजना राबविण्यात येत आहे. हा पोषण आहार शाळेतच शिजवून दिला जात असतो. यासाठी बचत गटांच्या महिलांना हे काम दिले जात असते. अशाच प्रकारे भंडारा शहरातील अंगणवाडीसाठी आहार शिजविण्यासाठी बचत गटांना काम देण्यात आले आहे. मात्र, या बचत गटांकडून दिला जाणारा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे आता समोर आले आहे.
तुमसर शहरातील अंगणवाडी केंद्रातील पोषण आहार शिजविण्याचे कंत्राट बचत गटांना देण्यात आले आहे. मात्र बचत गटाच्या माध्यमातून बालकांना निकृष्ट पोषण आहार दिला जात असल्याने अंगणवाडी सेविका यांनी याची तक्रार नगरपरिषदकडे केली आहे. मात्र याकडे नगर परिषदचे अधिकारी यांनी लक्ष दिले नाही. आता पुन्हा याची तक्रार करण्यात आली असुन अधिकारी काय? कारवाई करतात ते बघावं लागणार आहे.