अकोला: सत्ताधारी महायुतीतील घटकपक्ष असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची अमरावती जिल्ह्यात भेट होणार आहे. त्यामुळे आमदार बच्चू कडू हे महाविकास आघाडीत परत येणार का? या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, यावर आता स्वतः शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते अकोल्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
महायुतीत आमदार बच्चू कडू नाराज आहेत, त्यांना महाविकास आघाडीत आणण्यासाठी काही प्रयत्न करणार का? असा प्रश्न प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विचारल्यानंतर शरद पवार म्हणाले, “मी बच्चू कडूंच्या घरी जाणार, त्यात काहीही राजकीय हेतू नाही. मला चहासाठीत्यांनी आमंत्रण दिलं आहे. त्यामुळे मी जात आहे. एका विधानसभेच्या सदस्यानं चहासाठी बोलावलं, तर एवढी चर्चा करण्याची गरज नाही.” असंही पवार म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांना ‘इंडिया’ आघाडीत कधी सामावून घेणार? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले , “मला माहिती नाही. पण, इंडिया आघाडीच्या बैठकीत मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना प्रकाश आंबेडकरांशी संपर्क साधून त्यांच्यासह निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करावे, असं सांगितलं आहे. मात्र, आम्हा सर्वांची इच्छा आहे की, प्रकाश आंबेडकरांबरोबर एकत्र जाऊ.” असं देखील पवारांनी सांगितलं.