अमरावती: लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यानंतर सिनेसृष्टीतील कलाकार निवडणुकीला उतरणार असल्याच्या चर्चांना एकच उधाण येते. अभिनेत्री माधुरी दीक्षित मुंबईतून लोकसभेत लढणार आणि नाना पाटेकर हे खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी इच्छूक असल्याच्या बातम्या समोर काही दिवसांपूर्वी समोरआल्या होत्या. एका वृत्तवाहिनीवर बोलताना नाना पाटेकर यांनी आपली राजकारणाबाबत काही मतं व्यक्त केली होती, त्यानंतर ही चर्चा सुरू झाली. याबाबतचा प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अमरावती येथे पत्रकारांनी विचारला, त्यावर पवार यांनी अवघ्या एका वाक्यात उत्तर दिले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखविले होते, अशा बातम्या आल्या होत्या. मात्र, पाटेकर यांनी स्वतःहून जाहीरपणे यावर अद्याप भाष्य केलेले नाही. सिंहगड येथे नाना पाटेकर यांचे फार्महाऊस असून ते बराच काळ खडकवासला मतदारसंघात मुक्कामी असतात. त्यामुळेच खडकवासला मतदारसंघाशी त्यांचे नाव जोडण्यात आल्याचे समजते.
यावर शरद पवार यांना अमरावती येथे सदर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, खडकवासला मतदारसंघ माझ्या घराजवळ आहे. नाना पाटेकर माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे, हे मी ऐकलेले नाही, असं पवार म्हणाले.