भंडारा : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत. अजित पवारांचा बीडमधील बडा नेता शरद पवार यांच्या गटात सहभागी होण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दुसरीकडे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं.
तसेच आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं त्यांनी त्या कार्यक्रमात बोलून दाखवलं. अशातच आता अजित पवार गटाला भंडाऱ्यात पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची भंडाऱ्यात वर्चस्व आहे. पण भंडाऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार मधुकर कुकडे हे शरद पवार गटात सहभागी होण्याची दाट शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भंडाऱ्यात कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत कुणबी समाजाचे नेते माजी खासदार मधुकर कुकडे यांची उपस्थिती लावली होती. मधुकर कुकडे यांची या बैठकीतील उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मधुकर कुकडे यांच्या उपस्थितीने प्रफुल्ल पटेल यांना हा जबर धक्का मानला जात आहे.
मधुकर कुकडे यावेळी बोलताना म्हणाले कि, अहंकार कुणाला आहे हे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या नेत्याचा अहंकार उतरवायचा आहे, असं म्हणत मधुकर कुकडे यांनी नाव न घेता प्रफुल्ल पटेल यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्याशी माझे जुने संबंध आहेत आणि त्यांच्या विचारानेचं महाराष्ट्र पुढे जाणार आहे.
शरद पवार हे जगातील पहिले नेते आहेत ज्यांनी शेतकऱ्यांचे 70 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केलं आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना खताचे भाव वाढले नाहीत. मात्र, आज शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. त्यामुळेच त्यांच्या विचारधारेसोबत आहे, असं कुकडे म्हणाले.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीत आजही मी काम करत आहे. महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याप्रमाणे प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत मी होतो, असंही मधुकर कुकडे यावेळी बोलताना म्हणाले.