चंद्रपूर: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पक्षातील अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता लोकसभा निवडणुकीत त्याच खासदारांची उमेदवारी कापली आहे. यानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना शिंदे गटाचे सात खासदार हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याने आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, शिंदेंच्या सात खासदारांची काय अवस्था झाली. उद्धव ठाकरे भेटत नव्हते म्हणणाऱ्यांना आता लोकसभेचे तिकीटही भेटत नाही, निम्मे खासदार आणि आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे गट गोंधळलेले आहेत. भारतीय जनता पक्षाची चांगलीच दमछाक होत आहे. इंडिया आघाडी यावेळी भाजपचे सत्तेत येण्याचे स्वप्न पुर्ण होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, विदर्भात काँग्रेसला प्रचंड अनुकूल परिस्थिती आहे. पहिल्या टप्प्यातील पाचही ठिकाणी जनता काँग्रेसच्या बाजूने आपला कौल देईल. विद्यमान केंद्र सरकारच्या बाबतीत लोकांच्या मनात राग आणि एक प्रकारची चीड आहे. गडचिरोली लोकसभा आम्ही जिंकू, भाजपला येथे दुसरा पर्याय मिळाला नाही. गडचिरोलीत किरसान उभे असून मोठ्या मताने ते निवडून येतील, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
सांगली लोकसभेसाठी शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. त्याविषयी विजय वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, सांगलीचा मुद्दा फार ताणण्याची गरज नाही. ती जागा ही सुरुवातीपासून काँग्रेसचीच होती. या जागेच्या वादात फार ताणून घ्यायचे नाही. आमच्या नेतृत्वाचा जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य राहील, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.