नागपूर : तू मला आवडते. मी म्हणतो त्या ठिकाणी तुला यावे लागेल, अन्यथा तुला नोकरी गमवावी लागेल, अशा असंख्य आक्षेपार्ह कॉमेंट्स पास करून संस्थाचालकाने शाळेतील शिक्षिकेला भंडावून सोडले. शेवटी वैतागून शिक्षिकेने राज्य महिला आयोगाकडे दाद मागितली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शिक्षण विभागाला सत्य तपासून योग्य तो अहवाल सादर करण्याचे निर्देशित केले. त्यामुळे आता शाळेतील विद्यार्थिनीपाठोपाठ शिक्षिकाही असुरक्षित असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
शहरातील ही प्रसिद्ध शाळा आहे. संस्थाचालक गब्बर असून काही दिवसांपासून तो अधीनस्थ शाळेतील शिक्षिकेला त्रास देत होता. विविध कॉमेंट्स पास करून तू आपल्यासोबत यावे, असे बोलून छळ करायचा. खुद्द संचालक अशा प्रकारचे कृत्य करीत असल्याने तिला धक्का बसला. तू आपल्यासोबत यावे, अन्यथा नोकरीला मुकावे लागेल, अशी धमकी देत होता. पीडित शिक्षिकेने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. परंतु, त्रास टोकाला गेला. शेवटी पीडितेने राज्य महिला आयोगाचे दार ठोठाविले. शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. आयोगाने ही बाब गांभीर्याने घेत याप्रकरणी शिक्षण विभागाला योग्य त्या कारवाईच्या सूचना केल्या.
शिक्षण विभागाने तत्काळ हे प्रकरण हाताळण्याचा निर्णय घेतला. पीडित शिक्षिकेला विश्वासात घेऊन या प्रकरणातील आणखी बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. संस्थाचालकालाही नोटीस देऊन याबाबत पुढील कारवाईविषयक निर्णय घेण्याची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शिक्षण विभागाच्या खासगी अनुदानित शाळेत महिला शिक्षिकांची मोठी संख्या आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून रान पेटले असताना अध्यापनासाठी येणाऱ्या शिक्षिका किती सुरक्षित आहे, हा प्रश्न समोर आला आहे.
पीडितांना थेट तक्रारीचे आवाहन : शिक्षणाधिकारी
अशी प्रकरणे निश्चितच गंभीर आहेत. महिला शिक्षिकांना कुणी त्रास देत असेल किंवा त्यांचे मनोबल खच्चीकरण करीत असेल, त्याविषयीची थेट तक्रार करावी. त्यावर वेळीच समुपदेशन व संबंधितांवर योग्य ती कारवाई करणे सोपे जाईल, असे आवाहन माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी केले आहे.