अमरावती : अमरावतीमध्ये एका तरुणाने आपल्या वयोवृद्ध वडिलांची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील भामोद येथे ही घटना घडली. याप्रकरणी अमरावती पोलिसांनी अतुल कात्रे (४० वर्षे) या तरुणाला अटक केली आहे. रागाच्या भरात आपण हे कृत्य केले असल्याचे आरोपीने कबुली दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वृद्धापकाळात मुलगा सांभाळ करत नसल्याची तक्रार नातेवाईकामध्ये करणाऱ्या वयोवृद्ध पित्याची मुलाने हत्या केली. याचा राग धरून संतापलेल्या मुलाने लोखंडी बत्याने डोक्यावर वार करून वडिलांची हत्या केली आहे. दर्यापूर तालुक्यातील भामोद येथे ही घटना घडली. रामकृष्ण कात्रे (६० वर्षे) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी अतुल कात्रेला पोलिसांनी अटक केली.
अतुलने राहत्या घरामध्येच आपल्या वडिलांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच येवदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पोलिस तपास करत आहेत. मात्र जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याच्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
तिला आपल्या भावावरच संशय..
रामकृष्ण कात्रे यांना ३ मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या दोन मुलींचे लग्न झाले आहे. त्यांची मुलगी मयुरीला तिच्या नातेवाईकांनी फोन करून वडीलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. मयुरीने वडिलांच्या घरी धाव घेतली असता तिला वडिलांच्या डोक्याला जखमा आणि सर्वत्र रक्त पडलेले दिसले. त्यामुळे आपल्या वडिलांची हत्या झाल्याचा तिला संशय आला. तिला आपल्या भावावरच संशय होता. याबद्दल तिने पोलिसांना सांगितले असता पोलिसांनी अतुलला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तर त्याने वडिलांच्या हत्येची कबुली दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.