अमरावती : उद्धव ठाकरे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत काल सायंकाळपासून अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका सभेमध्ये नवनीत राणांवर टीका केली आहे.
विकासाचं पोरगं तुम्हाला झाले नाही, म्हणून तुम्ही दुसऱ्याचे नवरे करता. ती बाई तुम्हाला खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे. तुम्हाला बोलावेल पण तुम्ही जायचं नाही, असं वादग्रस्त वक्तव्य उद्धव ठाकरे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. अमरावतीच्या दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. राऊत यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत
उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत काल सायंकाळपासून अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी एका सभेमध्ये बोलताना संजय राऊत यांनी नवनीत राणांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, ज्या बाईने मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मातोश्री विषयी अपशब्द वापरले, त्या बाईचा पराभव करणे हे शिवसैनिकांचे कर्तव्य समजून कामाला लागा. बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश समजून ताकदीने कामाला लागा. मातोश्री हे आमचं मंदिर आहे. त्या मंदीरात येऊन अमित शाहा खोटं बोलले, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
विकासाचं पोरगं तुम्हाला झालं नाही
तसेच पुढे बोलताना म्हणाले, विकासाचं पोरगं तुम्हाला झालं नाही, म्हणून तुम्ही दुसऱ्याचे नवरे करता. ती बाई तुम्हाला खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे. तुम्हाला बोलावेल पण तुम्ही जायचं नाही. आपला उमेदवार बलवंत वानखेडे आहे. रात्र वैऱ्याची आहे. रात्रीस खेळ चाले, अशी जहरी टीका नवनीत राणांवर राऊत यांनी केली आहे.
पुढे म्हणाले, जे घाबरले ते पळाले, ते गद्दार झाले. पळपुटेपणा करणाऱ्यांचा कधीच इतिहास लिहिला जात नाही. 56 इंचाची छाती महाराष्ट्रात नाही, तर लडाखमध्ये दाखवा. कधीच हा महाराष्ट्र मोदी, शाहंपुढे गुडघे टेकणार नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आठ आठ दिवस वेटिंगवर ठेवले जाते. रोज उठतात दिल्लीला जातात. हा मुख्यमंत्री एवढा लाचार आहे, अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.