कोठारी (चंद्रपूर): अयोध्येमधील प्रभू श्रीराम मंदिर, दिल्लीमधील नवी ससद भवनाच्या निर्मितीमध्ये महाराष्ट्राने मोलाचा वाटा उचलला होता. राममंदिर आणि संसदेमधील कामासाठी महाराष्ट्रातून लाकूड पुरविण्यात आला होता. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून देशाच्या पंतप्रधानाची खुर्चीही बल्लारपुरातील सागवानाच्या लाकडांपासून बनणार आहे. यासाठी तब्बल ३ हजार घनमीटर सागवान लाकडाची आवश्यकता असून यानिमित्ताने काष्ठ रवानगी सोहळा बल्लारपूर येथे १० सप्टेंबरला सकाळी ११.०० वाजता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला.
पंतप्रधानांच्या खुर्चीसह पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय मंत्रीमंडळ सभागृह, केंद्रीय मुख्य सचिवांचे दालन तयार करण्यासाठी हे सागवान वापरण्यात येणार असल्याची माहिती आहे. देशात सर्वोत्तम सागवान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात असल्याने येथील लाकडापासून दिल्ली कार्यालयातील लाकडी साहित्य तयार करण्याचा निर्णय केंद्रीय समितीने घेतला आहे.
राम मंदिर, संसद भवनानंतर पंतप्रधानांच्या खुचर्चीच्या रुपात महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर सागवानाचे जंगल आहे, तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आढळणारे मोलाकार लाकूड आणि चिरण सागवान मजबूत आणि सर्वोत्तम लाकूड मानले जाते. त्याशिवाय ते प्रदीर्घ काळ टिकते. त्यामुळे त्याला देशभरातून मोठी मागणी आहे. याआधी राममंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासह इतर कामे याच लाकडाने केली होती.
राम मंदिराच्या निर्मितीवेळी १८०० क्यूविक मीटर लाकूड अयोध्येला रवाना करण्यात आले होते. तसेच नव्या संसद भवनाच्या निर्मितीवेव्येही या लाकडाचा वापर करण्यात आला होता. मंगळवारी वनविकास महामंडळ कल्लारपूर येथील आगारात काष्ठ रवानगी सोहव्य आयोजित करण्यात आला होता.