गडचिरोली: नक्षल चळवळीत असताना ७० हून अधिक गुन्हे करत सतत सुरक्षा दलातील जवानांना चकवा देणारा जहाल नक्षलवादी रूपेश मडावी याचा महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. रूपेश मडावीवर ३ राज्यांत ७५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या घटनेमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर सोमवारी (२३ सप्टेंबर) झालेल्या चकमकीत गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय असलेला तीन राज्यांत मिळून ७५ लाख रुपये बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवाद्याला ठार करण्यात आले. या नक्षलवाद्याची ओळख पटली असून, त्याचे नाव रूपेश मडावी (रा. सिंदा देचलीपेठा) असे आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून ६ किलोमीटर अंतरावर अबुझमाडच्या जंगलात छत्तीसगडच्या सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षली ठार झाले होते.
यातील पुरुष नक्षलवाद्याची ओळख पटली असून, गेल्या २० वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल चळवळीत सक्रिय भूमिकेत असलेला रूपेश मडावी याचा त्यात समावेश आहे. तो नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य आणि कंपनी क्रमांक १० चा कमांडर आहे. त्याच्यावर ७० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून, पोलीस उपनिरीक्षक वनमाने यांच्यासह काही पोलीस जवानांच्या हत्येचा तो गुन्हेगार आहे. लोकसभा निवडणुकीत नक्षलवाद्यांनी कोठी येथे मतदान केंद्रावर बीजीएलचा मारा केला होता. त्यातही रूपेश मडावीची प्रमुख भूमिका होती. हत्या, जाळपोळ आणि इतर गंभीर गुन्हे रूपेश मडावीवर दाखल करण्यात आले आहेत.