नागपूर : नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वस्तीत राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीला जाळ्यात ओढून नागपूर शहर पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने बलात्कार करून मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाची चित्रफिती तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपी पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. कवडू धुर्वे (रा. सुरेन्द्रगढ) असे आरोपी निवृत्त पोलिस उपनिरिक्षकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत पीडित १४ वर्षीय मुलगी तिच्या आईवडिलांसह राहते. ती आठवी इयत्तेत शिकत आहे. तिच्या वस्तीत आरोपी कवडू हा पीएसआय राहतो. तो शहर पोलिस दलातील मोटर परिवहन विभागातून सेवानिवृत्त झाला आहे.
पीडित मुलीच्या वडिलांशी त्याची घट्ट मैत्री होती. त्यामुळे तो नेहमी त्यांच्या घरी येत होता. त्याची वाईट नजर मुलीवर पडली. घरी कुणी नसताना त्याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मुलीशी अश्लील चाळे केले. आईवडिलांना न सांगण्याची धमकी त्याने मुलीला दिली होती. मुलीने कुटुंबियांकडे तक्रार न केल्यामुळे पीएसआयची खूप हिम्मत वाढली होती.
दरम्यान, पुन्हा त्याने वेळोवेळी त्या मुलीच्या घरी जाऊन तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तिला त्याच्या घरी बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचे भ्रमणध्वनीमध्ये चित्रिकरण केले. तेव्हापासून तो नेहमी तिला अश्लील चित्रफिती समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन गेल्या अनेक दिवसांपासून तिच्यावर बलात्कार करीत होता.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलगी त्याच्यापासून दुरावा ठेवत होती. त्याने तिला अश्लील चित्रफिती प्रसारित करण्याची धमकी दिली होती. तरीही त्या मुलीने हिम्मत एकवटून त्याला विरोध केला. मुलीने दुरावा ठेवल्याने त्याने वस्तीतील एका व्हॉट्सअप ग्रूपवर तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफिती पोस्ट केल्या. काही नागरिकांनी या विषयी मुलीच्या वडिलांना माहिती दिली. या प्रकरणी मुलीचे कुटुंबिय थेट गिट्टीखदान पोलीस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी फिर्यादीवरून पोलिस उपनिरीक्षक कवडू धुर्वे याच्यावर बलात्कारासह गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.