नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर महाराष्ट्र आणि जगभरात साहित्य उपलब्ध आहे. हजारो इतिहासकारांनी शिवरायांच्या जीवनप्रवासाचा अभ्यास संशोधन करून विविध भाषेत लेखन केले आहे. स्वराज्याचे संस्थापक म्हणून छत्रपती शिवरायांची ख्याती जगभरात आहे. मात्र, त्यांना स्वराज्याची प्रेरणा देणारे त्यांचे पिता शहाजीराजांच्या जीवनावर तितकासा परामर्श घेतला गेला नाही.
हीच उणीव दूर करण्याचा प्रयत्न पुण्यातील इतिहास अभ्यासक अमर युवराज दांगट यांनी आपल्या १० वर्षांच्या अथक परिश्रमातून ‘रणधुरंधर शहाजीराजे भोसले’ या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. ‘रणधुरंधर शहाजीराजे भोसले’ या पुस्ताकाचे प्रकाशन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी करण्यात आले. यावेळी इतिहास अभ्यासक – लेखक अमर युवराज दांगट, सागरराज बोदगिरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी नितीन गडकरी यांनी दांगट यांनी पुस्तक लिहिण्यासाठी १० वर्षे राज्यासह कर्नाटकात विविध ठिकाणी फिरून घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले.
यावेळी बोलताना अमर युवराज दांगट म्हणाले, ३५० वर्षांच्या इस्लामिक आणि पारतंत्र्याच्या काळात जनतेच्या मनातील स्वाभिमान जागृत करून नवसंजीवनी देण्याचे महान कार्य शहाजीराजेंनी केले. मराठ्यांना स्व अस्तित्वाचा साक्षात्कार त्यांनी सर्वप्रथम घडविला म्हणूनच शहाजीराजांच्या उत्तुंग कार्यकर्तुत्वावर लिहण्याचा संकल्प गेल्या दहा वर्षांपूर्वी केला आणि देशभरात भ्रमंती करून कर्नाटकातील होदगिरे या गावात शहाजीराजांच्या समाधीस्थळी संकल्पपूर्ती झाली.
अस्सल संदर्भाचा आधार घेत शहाजीराजांचा संपूर्ण जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न मी या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. कर्नाटकात त्यांनी निर्माण केलेले प्रच्छन्न राज्य आणि महाराष्ट्रात स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांचे कशाप्रकारे योगदान होते, याची तपशिलवार मांडणी या पुस्तकात करण्यात आली आहे.
शहाजीराजेंचा जीवनप्रवास त्यांनी गाजविलेल्या व अद्याप अपरिचित असणाऱ्या मोहिमांची माहिती अनेक ठिकाणी भेटी देऊन अस्सल संदर्भ गोळा करून आणि शकडो जणांकडून दाखले घेऊन अखेर रणधुरंधर शहाजीराजे भोसले या पुस्तकास मूर्त स्वरुप प्राप्त झाले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन माझे प्रेरणास्थान असलेल्या गडकरी साहेबांच्या हस्ते करता आले याचे मला समाधान वाटते. ऐतिहासिक ठेवा असलेले ‘रणधुरंधर शहाजीराजे भोसले’ हे पुस्तक हवे असल्यास 7219403108 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन दांगट यांनी केले आहे.