Ravikant Tupkar : बुलढाणा : राज्यात शेतकऱ्यांच्या मालाला बाजरभाव मिळत नाहीये. त्यातच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आहे. कापूस आणि सोयाबीनच्या दराबाबत रविकांत तुपकर यांनी 29 तारखेला मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी सीआरपीसी 149 अंतर्गत नोटीस बजावली होती. मात्र रविकांत तुपकर हे त्यांच्या निर्णयावर ठाम होते. 29 नोव्हेंबर रोजी मंत्रालय ताब्यात घेणारच अशी भूमिका असल्याचे ठणकावून सांगितल्याने आज अटक करण्यात आली. रविकांत तुपकर यांच्या अटकेने काही भागात शेतकरी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तुपकर यांच्या अटकेचे पडसाद उमटण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
नेमक काय प्रकरण
शेतकऱ्यांसाठी पांढरे सोने म्हणून बघितल्या जाणाऱ्या कापूस आणि सोयाबीन पिकाला योग्य हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरयांनी सरकारला इशारा दिला आहे. कापूस उत्पादक शेतकरी आणि शेतमजूर यांच्या विविध मागणीसाठी गेल्या 20 नोव्हेंबरला बुलढण्यात तुपकरांनी भव्य शेतकरी एल्गार मोर्च्याचे आयोजन केले होते. या मोर्च्यात तुपकरांनी कापूस आणि सोयाबीनच्या पिकाला योग्य हमी भाव द्यावा या मागणीसाठी सरकारला अल्टिमेटम दिला होता. आता याच प्रश्नावर रविकांत तुपकरांनी थेट मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला आहे. सरकारने 28 तारखेपर्यंत कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर तत्काळ तोडगा काढला नाही तर 29 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट मंत्रालयाचा ताबा घेऊ. असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे.
काय आहे मागणी
पीक विम्याची अग्रिम आणि शंभर टक्के पीक विमा भरपाई मिळावी यासह अनेक मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. सोयाबीन,कापूस,इतर पिकांच्या नुकसानीपोटी एकरी दहा हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी. सोयाबीनला प्रती क्विंटल नऊ हजार,कापसाला प्रती क्विंटल किमान 12 हजार 500 रुपये भाव द्यावा.तसेच सरकारने कापसाला व सोयाबीनला एक आठावड्यात योग्य हमी भाव दिला पाहिजे.
रविकांत तुपकरांची फेसबुकवर पोस्ट
अशा नोटीसांची मला सवय आहे,अशा नोटीसांना आम्ही भीक घालत नाही, शेतकऱ्यांचा हक्क मागणे हा जर गुन्हा होत असेल तर तो आम्ही कायम करणार.पोलीसांनी सरकारच्या इशाऱ्यावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये, आंदोलनात आम्ही शहिद होण्याची तयारी आहे. मंत्रालय कोणाच्या बापाचे नसून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आहे.त्यामुळे मंत्रालयात जाण्यापासून शेतकऱ्यांना कोणीही रोखू शकत नाही. सरकारने तातडीने सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे बाजूने निर्णय घ्यावे,अन्यथा 29 नोव्हेंबरला हजारो शेतकरी मंत्रालयाचा ताबा घेतील.”सरकार हमसे डरती हैं,पुलिस को आगे करती हैं ”अश्या आशयाची पोस्टरविकांत तुपकरांनी फेसबुकवर करत सरकारला इशारा दिला आहे.