मुंबई: वर्ध्याचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. “बलात्काराच्या आरोपातून वाचण्यासाठी म्हणून रामदास तडस यांच्या मुलाने पूजा तडसशी विवाह केला. त्यानंतर त्या मुलीच काय झालं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उमेदवाराने, मोदीजींचा परिवार संभाळला का? फक्त कारवाईच्या भीतीने फक्त लग्न केलं. त्याने पत्नीला वेगळ्या फ्लॅटवर नेऊन ठेवलं. पुढे तिची काय अवस्था झाली, हे सुद्धा पाहिलं नाही” असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
“खासदार रामदास तडस यांनी स्वत:च्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माझ्याशी लग्न लावून दिलं. त्यानंतर मला फ्लॅटवर नेऊन टाकलं. केवळ उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा तिथे वापर करण्यात आला. त्यामधून एका बाळाचा जन्म झाला. बाळाचा जन्म झाल्यानंतर डीएनए कर म्हणून आरोप झाले” असा आरोप पूजा तडस यांनी केला आहे. “खासदार रामदास तडस म्हणतात, डीएनए टेस्ट कर, तेव्हा समाजातल्या माझ्यासारख्या मुलींनी नेमकं जायचे कुठे? मला प्रत्येकवेळी अपमानास्पद वागणूक दिली. घरी गेले, तेव्हा लोखंडी रॉडने मारहाण झाली. मी राहत असलेला फ्लॅट विकला. मुलाला बेदखल केलं म्हणता, मग त्याला घरात का ठेवलय?” असा प्रश्न पूजा तडस यांनी उपस्थित केला आहे.
“महिलांना देशात 33 टक्के आरक्षण देता. महिला सक्षमीकरणाबद्दल भरभरून बोलता. मग मला न्याय का नाही मिळत?. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 20 तारखेला वर्ध्याला सभेसाठी येणार आहेत. मी तुमच्याच परिवारातील एक लेक आहे, न्याय मागत आहे. मी जर तुमच्या परिवाराचा भाग असेल, तर मला आणि माझ्या बाळाला न्याय द्या. हा माझ्या स्वाभिमानाचा व अस्तित्वाचा प्रश्न आहे” अशी मागणी पूजा तडस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.