अमरावती : राज्यात राजकीय घडामोडीत वेग आला असून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. अशात सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यामधील वाढती लोकसंख्या आणि परप्रांतीयांबाबत मोठे विधान केले होते. यावरुन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधताना राज ठाकरे समाज दुभंगण्याची वक्तव्ये करत असून त्यांच्यावर टाडा लावून सरकारने त्यांना आतमध्ये टाकलं पाहिजे, असे धक्कादायक विधान केले आहे.
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले..?
“महाराष्ट्रातील माणूस हा देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये राहतो. मध्यप्रदेश गुजरात मध्येही राहतो. त्यांचं काय करायचं? त्यामुळे राज ठाकरे यांचे वक्तव्य समाज दुभंगण्याचे वक्तव्य आहे. समाज दुभंगला की देश दुभंगतो. त्यामुळे यांना युएपीए आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा ताबडतोब लागला पाहिजे,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. अमरावतीत ते माध्यमांशी बोलत होते. “अशा व्यक्तींना सरळसरळ टाडा लागला पाहिजे. सरकारने मागेपुढे न बघता अशांना आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे. त्यामुळे ही हिम्मत सरकारने दाखवावी. उद्या उठाव झाला या राज्याने म्हटले तुम जाव आणि तिकडच्या राज्याने म्हटले तुम जाव तर काय होणार?” असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
आपला सर्वाधिक पैसा हा बाहेरच्या लोकांवर खर्च होत आहे. ठाणे जिल्हा हा देशातील हा एकमेव जिल्हा जिथे 7-8 महापालिका आहेत. मग इथली लोकसंख्या ठाण्यातील लोकांनी वाढवली का? ही लोकसंख्या बाहेरच्या लोकांनी वाढवली. आपला पैसा त्यांची व्यवस्था करण्यातच जातो, आपल्या नोकऱ्याच्या जाहिराती युपी बिहारमध्ये येतात, मग आपल्या तरुणांना हे कळत नाही? असा मुद्दा मांडत राज ठाकरे यांनी परप्रातीयांवर भाष्य केले होते.