अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज अमरावतीत सभा घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांवर आश्वासनांची अक्षरश: खैरात केली. तसेच त्यांनी महिला मतदारांना केंद्रित केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील अनेक मुद्दे स्पष्ट करून सांगितले.
राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी सरकारने २०-२५ लोकांना अब्जाधीश केलं. नरेंद्र मोदी सरकारने अब्जाधीश तयार केले. आम्ही करोडो लोकांना लखपती बनवायला जात आहोत. तुम्ही म्हणाल की इंडिया आघाडीचं सरकार, काँग्रेसचं सरकार, करोडो लोकांना लखपती कसे बनवणार? हेच मी आज तुम्हाला सांगायला आलो आहे. आमचा जाहीरनामा वाचा.
पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी गेल्या दहा वर्षात तुमचं कर्ज माफ केले नाही. पण आम्ही सत्तेत आल्यावर तुमचं कर्ज तत्काळ माफ करु. याशिवाय, देशात एका कृषी आयोगाची स्थापना केली जाईल. जेव्हा कोणत्याही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज पडेल तेव्हा हा आयोग सरकारला कर्जमाफीची शिफारस करेल. त्यामुळे केवळ एकदाच नव्हे तर अनेकदा कर्जमाफी होईल, असं राहुल गांधी म्हणाले.
या देशात संपत्तीची कमी नाही. तुम्ही देशातील अब्जाधीश उद्योगपतींकडे बघा, त्यांचं घर, गाड्या बघा. ते पाहून आपल्याला लक्षात येईल की, देशात संपत्तीची बिलकूल कमी नाही. जर अब्जाधीश उद्योगपतींचं कर्ज माफ होऊ शकतं, तर गरिबांचं कर्जही माफ झालं पाहिजे. केंद्र सरकार उद्योगपतींचं कर्ज माफ करतंय, मग शेतकऱ्यांचं कर्जही माफ झालेच पाहिजे. अन्यथा देशात कोणालाही कर्जमाफी करता कामा नये, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
महिलांसाठी दरवर्षाला मिळणार लाख रुपये
अमरावतीमधील सभेत राहुल गांधी यांनी महालक्ष्मी योजनेची मोठी घोषणा केली. आम्ही प्रत्येक कुटुंबाची यादी तयार करणार आहोत. प्रत्येक कुटुंबातून एका महिलेची निवड केली जाईल. या महिलेच्या बँक खात्यात काँग्रेस पक्षाचं सरकार, इंडिया आघाडीचं सरकार प्रत्येक महिन्याला ८ हजार ५०० रुपये या हिशोबाने वर्षाला प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात एक लाख रुपये जमा केले जाणार असल्याची घोषणा राहुल गांधी यांनी केली. देशातील कोट्यवधी महिलांना महालक्ष्मी योजनेचा लाभ मिळेल, असा दावा देखील राहुल गांधी यांनी केला आहे.
अंगणवाडी सेविकांना दुप्पट मानधन देणार
राज्यात अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स गेल्या अनेक वर्षांपासून मानधनवाढीसाठी प्रयत्न करत असून इंडिया आघाडीचं सरकार येताच अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्सना दुप्पट मानधन देण्यात येणार असल्याची घोषणा देखील राहुल गांधी यांनी यावेळी केली.