नागपूर : राज्यात सद्या आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अनेक नेते दावे प्रतिदावे करताना दिसत आहेत. अशातच काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडे यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यात दैवी शक्ती असल्याचा दावा केला आहे. नागपुरात बोलताना पांडे यांनी राहुल गांधी यांच्यामध्ये दैवी शक्ती असल्याच वक्तव्य केले आहे. पांडे यांनी केलेले हे वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.
अविनाश पांडे यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आणि खासदार राहुल गांधी यांच कौतुक केलं. हे कौतुक करताना पांडे यांनी राहुल गांधी यांची तुलना थेट देवाशी केली आहे. जोवर एखाद्या व्यक्तीत दैवी शक्ती असत नाही किंवा त्याच्यावर अदृश्य शक्तींचा प्रभाव असत नाही, तोपर्यंत कोणताही व्यक्ती दहा हजार किलोमीटरची पायी यात्रा करू शकत नाही, असे पांडे म्हणाले आहेत.
राहुल गांधी यांनी देशातील स्थिती बघून थेट जनतेत जाण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. मात्र, असा निर्णय घेणं सोपं नाही. जोवर एखाद्या व्यक्तीत दैवी शक्ती असत नाही किंवा अदृश्य शक्तीचा प्रभाव नसतो. तोवर कोणताही व्यक्ती असे करू शकत नाही असा दावा सुद्धा पांडे यांनी यावेळी केला आहे.