अकोला : अकोल्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोल्यातील मोठी उमरी भागात भरवस्तीत देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. घरगुती जेवणाच्या मेसच्या नावाखाली हा देहविक्रीचा व्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक नागरिकांनीच हा प्रकार समोर आणला आहे. या प्रकरणी दोन महिला व चार पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अकोला शहरातील मोठी उमरी भागातील उच्चभ्रू वस्तीत हा देह विक्रीचा व्यवसाय सुरू होता. घरगुती जेवणाच्या मेसच्या नावाखाली हा संपूर्ण गोरखधंदा चालवला जात होता. मात्र, आज स्थानिक नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला आहे. स्थानिक नागरिकांना याबाबत माहिती मिळताच देहविक्री करणाऱ्या दोन महिलांसह चार पुरुषांना घरात कोंडून ठेवत, यानंतर सिव्हिल लाईन पोलीसांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर दोन महिलांसह चार पुरुष ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान प्रति ग्राहकांकडून २ हजार रुपये घेत ह्या महिला आपला देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याचं तपासात उघड झालं आहे. या प्रकरणात अधिक तपास आता सिव्हिल लाईन पोलीस करत आहेत. जवळपास दीड ते दोन तास घटनास्थळावर नागरिकांनी चांगलाच गोंधळ घातला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर स्थानिक नागरिकांचा संताप शांत झाला आहे.