नागपूर : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांच्यासह इतर आरोपींना नक्षलवादी संबंध प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. जीएन साईबाबा यांना जन्मठेप सुनावण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपींची पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. जीएन साईबाबा यांच्यासह इतर चार आरोपी निर्दोष असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारसह पोलीस दलाला मोठा झटका बसला आहे.
साईबाबा आणि अन्य साथीदारांनी दाखल केलेले अपीलवर ७ सप्टेंबर २०२३ रोजी अंतिम सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय राखीव ठेवला होता. या निकालात जी. एन. साईबाबा, प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिरकी आणि विजय तिरकी या सर्वांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात गडचिरोली सत्र न्यायालयाने ७ मार्च २०१७ रोजी विजय तिरकीला १० वर्षे कारावास तर अन्य सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्या विरोधात आरोपी उच्च न्यायालयात गेले होते.
एका अन्य साथीदाराचा मृत्यू
दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा ५४ वर्षाचे असून ते ९९ टक्के अपंग आहेत. ते सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत. मार्च २०१७ मध्ये गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबा आणि इतरांना नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याबद्दल आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारल्यासारख्या कारवायांमध्ये गुंतल्याबद्दल दोषी ठरवले होते. सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात साईबाबांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायमूर्ती रोहित बी देव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानेही त्यावर सुनावणी केली. त्यात आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. या प्रकरणात त्यांचा अन्य एक साथीदार पांडू नरोटे याचा २५ ऑगस्ट २०२२ रोजी आजारपणामुळे मृत्यू झाला होता.