यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. २८) यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, येथील भारी गावाजवळ पंतप्रधानांची सभा होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून पंतप्रधानांच्या सभेसाठी जय्यत तयारी केली जात होती. या मेळाव्याला महिला मोठ्या प्रमाणात येत असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. तब्बल ४५ एकरांवर उभारलेल्या कार्यक्रमस्थळी पंतप्रधान मोदी हे दीड लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधित करणार आहेत. या सभास्थळी लावलेल्या खुर्च्यांवर राहुल गांधी यांचे स्टिकर लावण्यात आले असून, यात काँग्रेसला देणगीचे आवाहन करणारी जाहिरात आहे. मोदींच्या सभेत राहुल गांधींच्या स्टिकर लावलेल्या खुर्च्या का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
पंतप्रधान मोदी यवतमाळमध्ये महिला बचत गटांच्या महामेळाव्याला संबोधित करणार आहेत. या सभेमध्ये एक लाखांहून अधिक महिला उपस्थित राहतील, असा आयोजकांचा दावा आहे. सभास्थानी बसण्यासाठी मोठ्या संख्येने खुर्च्या लावल्या असून, यातील बहुसंख्य खुर्च्यांच्या मागे राहुल गांधी यांचे स्टिकर लावण्यात आले आहेत. मोदींच्या सभेत राहुल गांधीच्या स्टिकर लावलेल्या खुर्च्या का?? असा प्रश्न सर्वांना उपस्थित होत आहे.
दरम्यान, या बाबीची शहानिशा केली असता, ही चूक खुर्च्या पुरवणाऱ्या कंत्राटदाराची असल्याचे समोर आले आहे. याच खुर्च्या काही दिवसांपूर्वी नागपुरात काँग्रेसच्या मेळाव्यात वापरण्यात आल्या होत्या. तेव्हा प्रत्येक खुर्चीच्या मागे काँग्रेसला देणगी देण्यासंदर्भात माहिती देणारे स्टिकर लावण्यात आले होते. त्यावर राहुल गांधी यांचा फोटो आणि काँग्रेस पक्षाला देणगी देण्यासंदर्भात आवश्यक तपशीलासह क्यूआर कोड छापण्यात आलेला होता. आज मोदीच्या सभेसाठी आणलेल्या खुर्च्यामध्ये काही खुर्च्या काँग्रेसच्या मेळाव्यात वापरण्यात आलेल्या असाव्यात आणि त्यामुळेच त्यांच्यावर हे स्टिकर दिसून येत आहेत.
यवतमाळ येथे येण्याची पंतप्रधानांची ही चौथी वेळ आहे. आजच्या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, कृषी मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, केंद्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर आदी उपस्थित राहणार आहेत.