नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. देशभरात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यासाठी प्रत्येक पक्षाने जोरदार तयारी सरू केली आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक लक्ष घालत आहेत. फेब्रुवारी महिन्यात पंचप्रधान दोन वेळा महाराष्ट्रात विदर्भात येण्याची शक्यता आहे. यवतमाळ येथे ११ फेब्रुवारीच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला बचत गटाच्या मेळाव्याला संबोधित करतील, अशी शक्यता आहे. आता पंतप्रधान फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात नागपुरात भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे.
भाजपच्या एससी सेलच्या देशभरातील सुमारे २५ हजार पदाधिकाऱ्यांचा खास मेळावा नागपुरात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना संबोधित करणार आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने पक्षाच्या वेगवेगळ्या आघाडीच्या खास सभा वेगवेगळ्या शहरात घेण्याचे ठरवले आहे. त्या अंतर्गत भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीची ही खास सभा नागपुरात होणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या दीड महिन्यात तिसऱ्यांदा मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबई, सोलापूर, नाशिक नंतर ते आता फेब्रुवारी महिन्यात नागपूर आणि यवतमाळ येथे येणार असल्याचे बोलले जात आहे. अद्याप कार्यक्रमाची घोषणा झाली नसली, तरी भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पंतप्रधानांच्या संभाव्य दौऱ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. नरेंद्र मोदी ११ फेब्रुवारीला तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे येऊन दर्शन तसेच नंगारा वास्तूचे लोकार्पण करून सभा घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दौऱ्याच्या अनुषंगाने आठवड्यातून दोन-तीन दिवसांत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि विविध विभागांचे अधिकारी नियोजनासाठी पोहरादेवी येथे येत आहेत. त्याशिवाय मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण शिंदे यांनी पंतप्रधानांच्या या संभाव्य दौऱ्याबाबत पोहरादेवी, वसंतनगर, उमरी बुद्रुक, वाईगौळ आणि पंचाळा या पाच ग्रामपंचायतींना ३ जानेवारी रोजी एक पत्र देऊन रस्ते दुरुस्ती, पूल दुरुस्ती, रस्त्यांवरील अतिक्रमण काढणे, आवश्यक तेथे फलक लावणे यासंबंधी सूचना केल्या आहेत.
दरम्यान, पंतप्रधानांचा दौरा निश्चित झाल्यास प्रशासनाकडून अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याची माहिती मिळत आहे. दौऱ्याची घोषणा झाल्यास पंतप्रधान मोदी जानेवारी महिन्यात नाशिक, नवी मुंबई आणि सोलापूर दौऱ्यावर आले होते. मुंबईत अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक येथे आयोजित २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवालाही हजर राहिले होते. त्यानंतर सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सोलापुरात पंतप्रधानांच्या हस्ते १५ हजार घरकुलांचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर आता पंतप्रधान पुन्हा महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंती असल्याने पंतप्रधान मोदी शिवनेरी किल्ल्यावर जाणार असल्याचे देखील बोलले जात आहे.