गडचिरोली : गडचिरोली येथून प्रगत महाराष्ट्राचं भीषण चित्र समोर आलं आहे. येथील आलापल्ली- भामरागड महामार्गावर महाराष्ट्राला लाजवणारा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने नाल्यांना पूर आल्यामुळे पूला अभावी जेसीबीच्या खोऱ्यात बसून एका गर्भवती महिलेला नाला ओलांडावा लागला आहे. हा प्रकार १९ जुलै रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या घटनेमुळे दुर्गम, अतिदुर्गम भागातील पायाभूत सुविधांचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. जेवरी संदीप मडावी (वय-२२,रा. कुडकेली ता.भामरागड) असे महिलेचे नाव आहे.
नेमकं काय घडल ?
याबाबत अधिक माहिती अशी की, जेवरी या गर्भवती महिलेची २७ जुलै ही प्रसूतीची तारीख होती. मात्र, तिला १९ जुलैलाच सकाळी प्रसुतवेदना सुरु झाल्या. त्यामुळे गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेतून भामरागड ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात होते. त्यावेळी त्यांना वाटेत नाला लागला. १८ जुलैला झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्यातून तुडुंब पाणी वाहत होते, त्यामुळे रुग्णवाहिका पुढे नेता येत नव्हती. शेवटचा पर्याय म्हणून महिला व तिच्या पतीला जेसीबीच्या खोऱ्यात बसवून नाल्याच्या पैलतिरी सोडले.
दरम्यान, आलापल्ली- भामरागड राष्ट्रीय महामार्गाचे सध्या बांधकाम सुरु असल्याने या नाल्यावर जेसीबी होता. त्या जेसीबीच्या खोऱ्यात बसवून नाला ओलांडून जेवरीला दुसऱ्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पावसाळ्यात दरवर्षी या परिसरातील रहिवाशांना रस्त्याअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे . मात्र, राज्य सरकारकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत. त्यामुळे तेथील रहिवाशी संताप व्यक्त करत आहेत.