अकोला : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली असून आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत नव्या आघाडीची घोषणा केली आहे. तसेच, राज्यातील सात जागांसाठी उमेदवारांची घोषणा देखील केली आहे.
प्रकाश आंबेडकरांनी एकूण सात जागांवर आपले उमेदवार जाहीर केले असून यामध्ये प्रामुख्यानं अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच, मनोज जरांगे त्यांच्या उमेदवारांबाबत 30 एप्रिलनंतर निर्णय घेतील असंही आंबेडकरांनी सांगितलं आहे.
प्रकाश आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले की, काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यामध्ये काही निर्णय झाले आहेत. काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो. विस्ताराने बोलणे झाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील.
पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचं समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका 30 तारखेला घेतील. जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायची विनंती केली आहे. त्यांची विनंती मान्य केली. जरांगे आणि दोघे मिळून लढणार असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
वंचितची पहिली उमेदवार यादी जाहीर
भंडारा-गोंदिया : संजय केवट
गडचिरोली : हितेश पांडुरंग मडावी
चंद्रपूर : राजेश बेले
बुलडाणा : वसंतराव मगर
अकोला : प्रकाश आंबेडकर
अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा : प्रा. राजेंद्र साळुंके
यवतमाळ-वाशिम : खेमसिंह पवार